लोहारा – लोहारा तालुक्यातील कानेगाव शिवारात कुत्र्याला दगड मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या असून, त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शेत गट नंबर ११५/२ मध्ये घडली.
पहिल्या घटनेत, गोपाळ अर्जुन कदम (वय ३४ वर्षे, रा. कानेगाव) यांनी २० मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, साहेब राम करंडे, सविता साहेब करंडे, संतोष साहेब करंडे व सचिन साहेब करंडे (सर्व रा. कानेगाव) यांनी १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कानेगाव शिवारातील गट नं. ११५/२ मध्ये फिर्यादीस कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९१, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत, सविता साहेब करंडे (वय ६० वर्षे, रा. कानेगाव) यांनी २० मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोपाळ अर्जुन कदम (रा. कानेगाव) याने १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता त्याच ठिकाणी, म्हणजे कानेगाव शिवारातील गट नं. ११५/२ मध्ये, फिर्यादी सविता व त्यांचा मुलगा संतोष यांना कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुकक्यांनी व कुदळीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गोपाळ कदम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एकाच कारणावरून झालेल्या या दोन्ही मारहाणीच्या घटनांमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लोहारा पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.