धाराशिव – येथील सांजा रोड, उस्मानपुरा परिसरात एका व्यक्तीच्या मालकीच्या जागेवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ एप्रिल रोजी घडली असून, याबाबत २० मे रोजी पोलिसांत तक्रार देण्यात आली.
सरफराज अहमद जमील अहमद मोमीन (वय ३९ वर्षे, रा. मिल्ली कॉलनी, धाराशिव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुनिल वाघमारे, लता वाघमारे आणि अन्य एक अनोळखी इसम (सर्व रा. सांजा रोड, उस्मानपुरा जवळ, धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सांजा रोड, उस्मानपुरा जवळ फिर्यादी सरफराज मोमीन यांच्या मालकीच्या सर्व्हे नंबर २१४/२(पे) असलेल्या जागेवर आरोपींनी संगनमत करून अनाधिकृतपणे अतिक्रमण केले. यावेळी आरोपींनी फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी सरफराज मोमीन यांनी २० मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून आनंदनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२९(२) (अतिक्रमण), ३५१(२)(३) (गुन्हेगारी धमकी/ धाकदपटशा) आणि ३(५) (गुन्हेगारी कट) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.