तुळजापूर : अहो मंडळी, ऐकलंत का? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात म्हणे हल्ली एक नवाच खेळ सुरू झालाय – नाव आहे “व्हीआयपी पास , कोण कोणाचा खास?” देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी हे मुख्य पीठ, जिथे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणातून लाखो भाविक येतात दर्शनाला, तिथे आता श्रद्धेच्या बाजारात व्हीआयपी पासेसचा काळाबाजार तेजीत असल्याची चर्चा होतीच. पण आता तर कहरच झालाय राव!
घडलंय तरी काय?
तर झालं असं की, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेबानी व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली. पण आपल्या तुळजापूरचे तहसीलदार, अरविंद बोळंगे साहेब, जे मंदिराचे ट्रस्टी पण आहेत आणि प्रशासक पण (म्हणजे काय, तर निर्णय पण त्यांचा आणि अंमलबजावणी पण त्यांचीच!), त्यांनी या नियमांना पार केराची टोपली दाखवली.
“पाहुणे आले दारी, नियम गेले बारी!”
आज सकाळीच बघा ना, बोळंगे साहेबांनी त्यांच्या एका पाहुण्याला आणि त्यांच्या कुटुंबाला , ज्यांच्याकडे कुठलाही अधिकृत व्हीआयपी पास नव्हता, थेट पितळी दरवाजातून देवीच्या गाभाऱ्यात एन्ट्री दिली. याचा व्हीडिओ पण व्हायरल झालाय म्हणे! म्हणजे सर्वसामान्य भाविकांनी रांगेत ताटकळत उभं राहायचं आणि साहेबांचे पाहुणे मात्र “अंदर की बात है” म्हणत थेट दर्शन घेणार! याला म्हणतात “ओळखीचा दरवाजा”!
तहसीलदारांचा ‘डबल’ रोल आणि ‘सिंगल’ नियमभंग!
आता गंमत बघा, ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे नियम लावले, त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी याच बोळंगे साहेबांवर आहे. म्हणजे ज्यांनी नियम पाळायचे आणि पाळायला लावायचे, तेच नियम मोडत असतील तर बोला आता! “अपुनिच भगवान है” असा काहीसा ॲटिट्यूड घेऊन साहेब कायद्याचा चोथा करून फिरत असल्याची जोरदार चर्चा तुळजापूरच्या पारावर रंगली आहे.
भाविकांचा सवाल, “हे काय चाललंय देवी ?”
या प्रकारामुळे सर्वसामान्य भाविकांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. “एकीकडे नियम आणि दुसरीकडे ओळखीचा दरवाजा, हा कुठला न्याय?” असा सवाल ते विचारत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी धाडसी निर्णय घेऊन व्हीआयपी कल्चरला आळा घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याच टीममधले अधिकारी जर असा ‘दे धक्का’ कारभार करणार असतील, तर देवीच मालक आहे!
आता या “पितळी दरवाजा प्रकरणावर” जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतंय, याकडे सगळ्या तुळजापूरकरांचं लक्ष लागलंय. तोपर्यंत, सर्वसामान्य भाविकांसाठी एकच सल्ला – रांगेत उभे राहा आणि “आई राजा उदो – उदो ” म्हणा! कारण इथे व्हीआयपींपेक्षा फक्त ‘व्हेरी इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज’ चालतात, नियम नाही!
व्हिडीओ बघा…