तुळजापूर : अहो मंडळी, काय सांगू तुम्हाला! महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दारी भक्तांसाठी काय सोय केलीये म्हणून सांगू! आपले लाडके, विकासाचे ‘महामेरू’ (असं ते स्वतःला म्हणवतात म्हणे!) आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तब्बल आठ कोटी रुपये खर्चून एक बस स्टँड नाही, तर चक्क एक ‘इनडोअर वॉटरफॉल’ तयार केलाय राव! म्हणजे बघा, विकासाची गंगा थेट छतावरून खाली!
आठवतंय का? काही महिन्यांपूर्वी साहेब मोठमोठे थ्रीडी व्हिडीओ दाखवत होते. “असं असेल आपलं बस स्टँड… प्रवाशांना स्वर्गसुख मिळेल!” वगैरे वगैरे. आता कळलं, स्वर्गसुखाचा अर्थ थेट ‘जल-अभिषेक’ होता तर! अहो, महिना व्हायच्या आतच या ‘स्वर्गीय’ छताला जागोजागी पान्हा फुटलाय. म्हणजे, तिकिट काढा आणि वरून पडणाऱ्या ‘तीर्थाचा’ मोफत लाभ घ्या! बोला, आहे का कुठं असं?
गेल्या काही दिवसांपासून तुळजापुरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि बस स्टँडच्या ‘विकासकामांची’ पार इज्जतच काढली. प्रवासी बसची वाट बघतायत आणि वरून थेंब… थेंब… टप… टप… जणू काही देवीचीच कृपा बरसतेय! एका संतप्त प्रवाशाने तर थेट आयोजकांच्या ‘विकासनीती’लाच आव्हान दिलंय. तो म्हणे, “अहो, यापेक्षा आमचा जनावरांचा गोठा बरा! निदान तिथं तरी जनावरं आरामात बसतात, भिजत नाहीत!” आता बोला, यापेक्षा मोठा पुरस्कार तो काय असणार? ‘गोठा-श्रेष्ठ’ बस स्टँड!
आमदार साहेब, तुम्ही तर दहा कामांपैकी एकच काम करता, तेही असं ‘निकृष्ट दर्जाचं सोनं’ की काय, कळंनाच झालंय! आधी व्हिडीओ पोस्ट करून कौतुकाची थाप स्वतःच मारून घेतली. आता गळती लागल्यावर गपगार! अहो, याचं श्रेय नाही घेणार का? म्हणा की, “माझ्या दूरदृष्टीमुळेच बसस्थानकात मोफत ‘रेन डान्स’ची सोय झाली!” किंवा “प्रवाशांना नैसर्गिक वातावरणाचा अनुभव देण्यासाठी खास ‘गळके छप्पर’ डिझाइन!”
परिवहन मंत्र्यांनी पण काय उद्घाटन केलंय! फित कापली की छतालाच पहिलं भगदाड पाडलं, याचा शोध घ्यायला हवा. आठ कोटी पाण्यात म्हणजे अक्षरशः पाण्यात गेले म्हणायचे! आता जनता विचारतेय, “साहेब, हे विकासाचं मॉडेल आहे की भ्रष्टाचाराचं ‘ओपनिंग सेरेमनी’?”
तर मंडळी, तुळजापूरला दर्शनाला येताय? मग छत्री, रेनकोट विसरू नका. कारण बस स्टँडवर कधीही ‘आठ कोटींची कृपावृष्टी’ होऊ शकते! आणि हो, आमदार साहेब, आता तरी बोला… नाहीतर लोक म्हणतील, “विकास तर झाला, पण तो गळतोय!”
व्हिडीओ बघा