धाराशिव: पहलगाम येथे आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले.1 या कारवाईतून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवल्याच्या प्रतिक्रिया उमटत असून, भारतीय सैन्याच्या या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी गुरुवारी धाराशिव शहरात भव्यदिव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. ‘भारत माता की जय’ आणि भारतीय सैन्याच्या शौर्याचा जयघोष करत या रॅलीने धाराशिवकरांमध्ये देशभक्तीची भावना जागवली.
शिवसेनेच्या वतीने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, जिल्हा संघटक सुधीर पाटील आणि जिल्हाप्रमुख मोहन पनूरे यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली.यावेळी उंडरगाव ता. लोहारा येथील श्री बबनजी महाराज ( साधू संन्याशी ) आवर्जून उपस्थित होते.
रॅलीचा प्रारंभ राष्ट्रमाता जिजाऊ चौक येथून झाला. त्यानंतर श्रीपतराव भोसले हायस्कूल, आर.पी. कॉलेज, छत्रपती संभाजी महाराज चौक, संत गाडगेबाबा महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला.
या रॅलीत शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय जवानांच्या परिधान केलेल्या वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. नागरिकांच्या हातात फडकत असलेले तिरंगे ध्वज, देशभक्तीपर गीते आणि वारकरी गीतांनी संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेनेचे पदाधिकारी, महिला, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, वारकरी, माजी सैनिक आणि मोठ्या संख्येने देशाभिमानी नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या विजयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.