धाराशिव: अवघ्या नऊ महिन्यांत धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांच्या जागी सांगलीहून रितू खोपर मॅडम येणार आहेत. पण मॅडम अजून रुजू झाल्या नाहीत, तोच इकडे पोलीस मुख्यालयात बदल्यांचा ‘अंतिम सामना’ सुरू झाल्याची कुजबुज आहे.
जाधव साहेबांची ‘निष्क्रिय’ इनिंग:
परंडा आणि तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणं, वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचा सुळसुळाट यामुळे जाधव साहेब “निष्क्रिय” ठरले, अशी चर्चा आहे. म्हणजे ९ महिन्यांत गुन्हेगारी रोखण्याऐवजी, बहुदा ती वाढवण्यासाठीच त्यांनी विशेष ‘प्रयत्न’ केले असावेत, असा विनोदी सूर उमटत आहे.


जाता जाता ‘बदलीचा प्रसाद’:
गंमत म्हणजे, जाधव साहेब आता निघाले असले तरी, जाता जाता त्यांनी ‘पुण्याचा प्रसाद’ वाटायला सुरुवात केली आहे. गेली काही दिवस रखडलेल्या पोलीस कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल यांच्या बदल्यांची प्रक्रिया त्यांनी वेगाने सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दररोज ५० पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात बोलावून ‘तीन पाकी एक चॉईस’ (पसंतीचे तीन ठिकाणे, त्यापैकी एक निवडायचे) विचारले जात आहे. या बदल्या नियमानुसार नसून, आर्थिक ‘देवाणघेवाण’ करून होत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. म्हणजे, ‘जादूमंतर’ करून काही अधिकारी आपली सोयीची जागा मिळवत असावेत!
थोडक्यात काय तर, एकीकडे नवीन ‘कप्तान’ येण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे जुने ‘खेळाडू’ जातानाही आपली ‘खिरापत’ वाटूनच चालले आहेत. या ‘बदलीच्या बाजारा’ला त्वरित आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता रितू मॅडम आल्यावर हा ‘खेळ’ थांबणार की अजून रंगणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल!







