धाराशिव – लोहारा तालुक्यातील राजेगाव येथे काल, २२ मे रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्हीकडील अनेक जण जखमी झाले असून, लोहारा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाण्याच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला
राजेगाव येथील रहिवासी एजाज समद पिरजादे (वय २८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काल सकाळी साडेआठ वाजता पावसाचे पाणी दारात येण्याच्या कारणावरून रशीद अजीम पिरजादे, नसरोद्दीन मोहम्मद हनीफ पिरजादे, अलीम रशीद पिरजादे, रजीयाबी मोहम्मद हनीफ पिरजादे आणि रुकसाना रशीद पिरजादे (सर्व रा. राजेगाव) या आरोपींनी त्यांना व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीने आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. एजाज पिरजादे यांच्या फिर्यादीवरून लोहारा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १२५, १२५(अ), ३५२, १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मागील भांडणातून दुसऱ्या कुटुंबावर हल्ला, महिलांनाही मारहाण
याच घटनेसंदर्भात, नसरोद्दीन मोहम्मद हनीफ पिरजादे (वय २५, रा. राजेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काल सकाळी साडेआठ वाजता एजाज समद पिरजादे, शाहरुख समद पिरजादे, समद अब्दुल पिरजादे, फयाज समद पिरजादे (सर्व रा. राजेगाव), गोरीबी अजमोद्दीन शेख, शाहबाज अजमोद्दीन शेख, सादिक अजमोद्दीन शेख (तिघे रा. खेड, ता. लोहारा) आणि मेहरुन बाबुमियॉ निरगुडे (रा. चिंचोली भुयार, ता. उमरगा) या आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मागील भांडणाच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीने व काठीने मारहाण करून जखमी केले.
नसरोद्दीन पिरजादे यांच्या आई रजीया, आत्या करीमा मुजावर, बहिण शाहीन शेख, रेश्मा बडुरे, चुलती रुक्साना पिरजादे आणि चुलतभाऊ अलीम पिरजादे भांडण सोडवण्यासाठी आले असता, त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. नसरोद्दीन पिरजादे यांच्या फिर्यादीवरून लोहारा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.