धाराशिव: शहरात मागील एक वर्षांपासून मंजूर असलेली रस्त्यांची कामे केवळ राणा पाटील यांच्या अडवणुकीमुळे रखडली होती, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केला आहे. आता जनरेट्यामुळे ही कामे सुरू होणार असून, यामध्ये राणा पाटील यांचे २२ कोटी रुपये बुडाल्याने त्यांची पोटदुखी सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे सिद्धार्थ बनसोडे, सरफराज काझी, राष्ट्रवादीचे बाबा मुजावर, युवासेनेचे रवी वाघमारे, राणा बनसोडे आदी उपस्थित होते.
सोमनाथ गुरव यांनी सांगितले की, शहरातील १४० कोटी रुपयांच्या ५९ मंजूर डीपी रस्त्यांचा अंदाजपत्रकीय दराने होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचे श्रेय महाविकास आघाडीला जाईल, या भीतीने राणा पाटील व त्यांचे समर्थक आता केवळ वावड्या उठवत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात याच मंडळींनी रस्त्यांच्या मुद्द्यावरून खासदार आणि आमदारांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सत्य लपून राहत नाही आणि राणा पाटलांचा स्वभाव पाहता त्यांना कुणी चांगलं केलेलं बघवत नाही, असा टोलाही गुरव यांनी लगावला.
गुरव पुढे म्हणाले की, “पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या २५० कोटींच्या कामांनाही याच राणा पाटलांनी स्थगिती आणली होती, हे जगजाहीर आहे. त्यामुळे आता राणा पाटील स्वतःचा चेहरा झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत.”
रस्त्याच्या कामांचा घटनाक्रम आणि आरोप
गुरव यांनी रस्त्याच्या कामांच्या दिरंगाईचा घटनाक्रमच वाचून दाखवला. ते म्हणाले की, “१४० कोटींच्या कामाला २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यानंतर सात दिवसांत निविदा प्रक्रिया राबवणे बंधनकारक असताना आणि ९० दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असताना, एक वर्ष होऊनही निविदा उघडली नाही. तेव्हा राणा पाटील व त्यांचे समर्थक काय करत होते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीने जनतेच्या हितासाठी हा विषय लावून धरला. ६ जानेवारी रोजी जनतेसह रस्ता रोको करण्यात आला, तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, २८ फेब्रुवारीनंतरही कामात कोणतीही हालचाल न दिसल्याने, २५ जानेवारी रोजी निविदा दर उघडण्यात आले. तरीही कामे सुरू होत नसल्याने २८ एप्रिल रोजी महाविकास आघाडीने आमरण उपोषण सुरू केले. तिसऱ्या दिवशी पालकमंत्र्यांनी भेट देऊन कामे करण्याचे आश्वासन दिले. पुढे, २ मे रोजी नगरपरिषद संचालनालयाने अंदाजपत्रकीय दराने कामे करून घेण्याबाबत पालिकेला पत्र दिले आणि २३ मे रोजी प्रधान सचिवांच्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे गुत्तेदार अंदाजपत्रकीय दरानेच काम करणार असल्याने शहरवासियांचे २२ कोटी रुपये वाचले आहेत, आणि याचमुळे राणा पाटील यांची पोटदुखी सुरू असल्याचे गुरव म्हणाले.
राणा पाटलांना आव्हान
राणा पाटील किंवा त्यांच्या समर्थकांनी ही कामे सुरू होण्यासाठी कोणाकडे काय पाठपुरावा केला, हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावे, असे आव्हान सोमनाथ गुरव यांनी दिले. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण राज्यात सर्व कामे अंदाजपत्रकीय दराने करण्याचा निर्णय घेतला होता असे भाजपची मंडळी सांगतात, मग राज्याच्या ऊर्जा विभागाकडून होणारी कामे अंदाजपत्रकीय दरापेक्षा अधिक दराने कशी होतात? असा सवालही गुरव यांनी उपस्थित केला.
सत्ताधारी मंडळींनी राजकारण न करता ही कामे गुणवत्तापूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, आम्ही तर ते करणारच आहोत. जनहिताच्या कामात राजकारण करू नये, असे आवाहनही सोमनाथ गुरव यांनी यावेळी केले.