धाराशिव: जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने फळबागांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दरांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनाही बसत आहे.
गेल्या आठवड्यात २० रुपये किलोने मिळणारे टोमॅटो आता ४० रुपयांवर पोहोचले आहेत. तर दोडका आणि शेवग्याने शंभरीचा आकडा ओलांडला आहे. इतर पालेभाज्यांच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने भाजीपाला काढणेही शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे.
मे महिन्यात वाढलेल्या उष्णतेमुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी भाजीपाला मोडला होता, तर काहींनी खरीप हंगामातील कामांसाठी आपली शेतं मोकळी केली होती. यामुळे मे महिन्यापासूनच भाजीपाल्याची आवक घटण्यास सुरुवात झाली होती. त्यातच आता अवकाळी पावसाने भर घातल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने व्यापारी चढ्या दराने विक्री करत आहेत. याचा परिणाम म्हणून गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. अवकाळी पावसाचा हा फटका शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही सोसावा लागत आहे.