उमरगा : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून व मुंबई मेट्रोमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून उमरगा येथील एका ३५ वर्षीय महिलेची तब्बल १५ लाख १० हजार ८११ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैसे परत मागितले असता पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला सुजाता मोहन घोडके (वय ३५, रा. शिंदे गल्ली, उमरगा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी निखली बाबुराव खाडे, शोभा संजय कोळी, वैशाली साबळे आणि छाया उर्फ राजनंदिनी अनिल हंकारे (सर्व रा. घालवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी संगनमत करून ही फसवणूक केली.
फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ०९ जानेवारी २०२४ ते दि. २८ डिसेंबर २०२४ या कालावधीत आरोपींपैकी एकाने (निखली खाडे) “मी पोलीस आहे, पीएसआय परीक्षा देतो तसेच मुंबई मेट्रोमध्ये बिपीन सिंग नावाचे अधिकारी व माझे पोलीस अधिकारी ओळखीचे आहेत, तुम्हाला नोकरी लावतो,” असे आमिष सुजाता घोडके व त्यांच्या मैत्रिणीला दाखवले. त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी फोन पे व गुगल पे द्वारे फिर्यादीच्या बँक खात्यावरून एकूण १५,१०,८११ रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली.
पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला असता, ” तुझ्यामुळे आमचा मानलेला भाऊ निखील बाबुराव खाडे याची नोकरी गेली आहे. त्याला तू जबाबदार आहेस, तुला आम्ही सोडणार नाही, बघून घेऊ,” अशी धमकी देत आरोपींनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.
याप्रकरणी सुजाता घोडके यांनी २६ मे २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३१८(४) (फसवणूक), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३५१(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.