धाराशिव: धाराशिव शहरातील शम्सपुरा फकिरा नगर परिसरात एका बंद घराचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २४ मे रोजी रात्री ते २५ मे रोजी सकाळच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिनाज इसमोद्दीन शेख (वय ४२ वर्षे, रा. शम्सपुरा फकीरा नगर, ता. जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मिनाज शेख यांच्या घराला दि. २४ मे २०२५ रोजी रात्री १०.०० वाजल्यापासून ते दि. २५ मे २०२५ रोजी सकाळी ०८.०० वाजेच्या सुमारास कुलूप होते. याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले ५८ नग सोन्याचे दागिने (ज्याची किंमत अंदाजे २,९९,००० रुपये) आणि रोख रक्कम ५०,००० रुपये असा एकूण ३,४९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच मिनाज शेख यांनी २६ मे २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३३१(४) (घरफोडी करण्याच्या उद्देशाने घरात अतिक्रमण) आणि कलम ३०५ (घरात चोरी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
उमरगा तालुक्यात एकाच रात्री दोन घरे फोडली; ७२ हजारांचा ऐवज लंपास, वृद्धाची तक्रार
उमरगा – तालुक्यातील तलमोड येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २५ मे रोजी रात्री ते २६ मे रोजी सकाळच्या दरम्यान घडली. याप्रकरणी एका ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांडुरंग यशवंत मोरे (वय ७५ वर्षे, रा. तलमोड, ता. उमरगा) यांच्या घराचे आणि त्यांच्याच गल्लीत राहणाऱ्या सोनाबाई मोरे यांच्या घराचे कुलूप दि. २५ मे २०२५ रोजी रात्री १०.०० ते दि. २६ मे २०२५ रोजी सकाळी ०८.०० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तोडले. चोरट्यांनी दोन्ही घरात प्रवेश करून कपाटातील व डब्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.
या दोन्ही घरफोड्यांमध्ये एकूण ३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम असा एकूण ७२,००० रुपये किमतीचा माल चोरीला गेल्याचे पांडुरंग मोरे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पांडुरंग मोरे यांनी दि. २६ मे २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात या घटनेची प्रथम खबर दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३३१(४) (घरफोडी करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी घरात अतिक्रमण), ३०५(अ) (घरात चोरी) आणि कलम ६२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. उमरगा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नारंगवाडी येथील २२० केव्ही उपकेंद्रातून लाखोंचा ऐवज लंपास
उमरगा – तालुक्यातील नारंगवाडी येथील २२० केव्ही उपकेंद्रात मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दिनांक २४ मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपासून ते २५ मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी उपकेंद्रातील तांब्याच्या धातूचे आयसोलेटर रॉड आणि टीबीक्स असा एकूण १ लाख ४२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नारंगवाडी येथील २२० केव्ही उपकेंद्रातील १३२ केव्हीचे ०६ बे चे अर्थ आयसोलेटर रॉड (एकूण १८ नग) आणि १३२ केव्हीचे टीबीक्स (३ नग) अज्ञात व्यक्तींनी चोरून नेले. चोरीला गेलेल्या मालाची एकूण किंमत १ लाख ४२ हजार ८०० रुपये इतकी आहे.
या घटनेप्रकरणी उपकार्यकारी अभियंता राजकुमार पंडितराव राऊत (वय ४४ वर्षे, रा. १३२ के.व्ही. उपकेंद्र, महापारेषण उमरगा) यांनी २६ मे २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात वीज उपकेंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.