धाराशिव: कळंब तालुक्यातील एकुरगा परिसरात काल (सोमवारी) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. या पावसाने टरबूज, आंबा, पपई आणि इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर लाखो रुपयांचे संकट कोसळले आहे. धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, एकुरगा परिसरात अवघ्या काही तासांत प्रचंड मोठा पाऊस कोसळला. यामुळे शेतकरी दिलीप वामन शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या टरबुजाच्या शेतात गुडघाभर पाणी साचले. पाणी ओसरण्यापूर्वीच तयार झालेली टरबुजे जागेवरच सडून गेली, ज्यामुळे शिंदे यांचे लाखोंचे नुकसान झाले. शिंदे यांनी टरबूज लागवडीसाठी २ लाख ७० हजार रुपये खर्च केले होते आणि त्यांना सुमारे साडेपाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते, मात्र अवकाळी पावसाने त्यांच्या सर्व आशा धुळीस मिळवल्या.
या विनाशकारी पावसामुळे श्रीकांत भिसे या शेतकऱ्याची नव्याने बांधलेली विहीरही जमीनदोस्त झाली आहे. परिसरातील आंबा, पपईच्या फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या मते हे नुकसान इतके मोठे आहे की त्याची भरपाई होणे कठीण आहे. अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आल्याने शेती पाण्याखाली गेली आहे.
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी तात्काळ एकुरगा गाठून चिखल तुडवत नुकसानग्रस्त कलिंगड शेतीची पाहणी केली. त्यांनी शेतकरी दिलीप शिंदे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यात सुमारे साडेतीनशे हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, यापैकी २९४ हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. एकूण नुकसानीचा आकडा ७ ते ८ कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
संबंधित तालुका कृषी अधिकारी आणि तलाठी यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आपत्ती व्यवस्थापनातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तसेच, नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची व पशुधनाची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. या अवकाळी संकटामुळे बळीराजा मात्र हवालदिल झाला असून, शासनाकडून तातडीने भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहे.
Video