भूम : अहो आश्चर्यम्! जिथे जिल्ह्याचे तीन सर्वोच्च बॉस – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, सीईओ मैनाक घोष आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर – पहिल्यांदाच शहरात येऊन भूम आणि परंडा तालुक्याच्या विकासाचा ‘अॅक्शन प्लॅन’ आखत होते, तिथे काही पठ्ठे मात्र आपल्याच मोबाईलच्या मायाजालात आकंठ बुडाले होते! क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात मंगळवारी, २७ तारखेला घडलेला हा ‘डिजिटल’ तमाशा पाहून शासकीय शिस्तीनेच कपाळावर हात मारून घेतला असावा.
एकीकडे जिल्हाधिकारी साहेब मान्सूनपूर्व तयारी, अतिक्रमित रस्ते, पाणंद रस्ते, गाळमुक्त धरण, वृक्ष लागवड आणि जलयुक्त शिवार अशा अत्यंत कळीच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करत होते. दुसरीकडे, सभागृहातले काही कर्मचारी मात्र ‘पबजी’त हेडशॉट मारण्यात किंवा इन्स्टाग्रामवरच्या रिल्सवर ‘स्क्रोलधाव’ घेण्यात दंग होते. जणू काही जिल्ह्याच्या विकासापेक्षा मोबाईलमधल्या ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’चीच त्यांना अधिक चिंता!
या प्रकारामुळे एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे – जर जिल्ह्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांसमोरच कर्मचाऱ्यांची ही अवस्था असेल, तर इतर वेळी सरकारी कार्यालयांमध्ये नेमके काय दिवे लावले जात असतील? विकासकामांचं गांभीर्य आणि नागरिकांच्या समस्या जणू मोबाईलच्या स्क्रीनआड गडप झाल्या होत्या. साहेबांच्या उपस्थितीचीही जरब राहिली नसेल, तर मग बोलायलाच नको! ही घटना म्हणजे शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर आणि कर्मचाऱ्यांच्या उत्तरदायित्वावर एक सणसणीत ‘डिजिटल’ चपराकच म्हणावी लागेल. खरंच, या मोबाईलच्या नादात आपण जिल्ह्याच्या विकासालाच ‘पॉज’ बटण तर दाबत नाही ना, याचा विचार करण्याची वेळ आली आहे!