परंडा – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी, २७ मे २०२५ रोजी केलेल्या कारवाईत नऊ जणांना गांजा सेवन करताना आणि एका व्यक्तीला विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना परंडा शहरातील सरकारी दवाखान्यासमोरील एका पत्त्याच्या शेडमागे दुपारी सव्वाएकच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरा परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद हनुमंतराव इज्जपवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या पथकासह परंडा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, सरकारी दवाखान्यासमोर, एका पत्त्याच्या शेडपाठीमागे काही इसम गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे दिसले. पथकाने तात्काळ कारवाई करत त्यांना जागीच ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी ९६७ ग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची किंमत अंदाजे २०,००० रुपये आहे, तसेच गांजा ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चार काळ्या व दोन तांबड्या रंगाच्या चिलीम आणि एक माचिस जप्त केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये फारूख हबीब सय्यद (वय ५२, रा. परंडा), बाबा भिवा शिंदे (वय ६५, रा. भोत्रा), काशिनाथ तुकाराम नरूटे (वय ५५, रा. पिंपरी), मुस्तफा शुकरखाँ पठाण (वय ४२, रा. सिंकदर गल्ली, परंडा), सुधाकर आबासाहेब देशमुख (वय ६९, रा. भोत्रा), जमिर गफुर सौदागर (वय ६३, रा. परंडा), युसुफ रजाक पटेल (वय ५५, रा. आवाटी, ता. करमाळा, जि. सोलापूर), अनिल प्रतापसिंग परदेशी (वय ५०, रा. आसु, ता. परंडा) आणि नितीन अंबऋषी शिरसकर (वय ४२, रा. माळी गल्ली, परंडा) यांचा समावेश आहे.
यातील फारूख हबीब सय्यद याच्याकडे विक्रीसाठी गांजा बाळगल्याचा आरोप आहे, तर इतर आठ जण गांजा सेवन करताना आढळून आले. चौकशीदरम्यान फारूख सय्यदने हा गांजा बार्शी येथील सचिन मिरगणे याच्याकडून आणल्याचे सांगितले.
सर्व आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(II)(A) आणि २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मधुकर सुर्वे करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार परंड्यात गांजा विक्री सुरु असल्याची माहिती गुगल मॅप लोकेशनसह नव्या पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना अज्ञात इसमाने पाठवली होती. खोकर मॅडम यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. मात्र मिळालेला मुद्देमाल आणि सांगितली माहिती यात तफावत आढळून आली.