नळदुर्ग : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी तुळजापूर तालुक्यातील इटकी येथील एका हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३२ हजार ६७० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि विविध कंपन्यांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. २७) दुपारी करण्यात आली असून, हॉटेलमधील एका २१ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोसिफ रफिक पठाण (वय २१ वर्षे, रा. इटकळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इटकी गावातील बसस्थानकाजवळ असलेल्या आलीशान हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा विक्रीसाठी ठेवल्याची माहिती नळदुर्ग पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून सदर हॉटेलवर छापा टाकला.
छाप्यादरम्यान हॉटेलमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला केसर युक्त विमल पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, शॉट999 सुगंधी तंबाखू आणि वि 1 कंपनीचा सुगंधी तंबाखू असा एकूण ३२ हजार ६७० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. हा सर्व साठा आरोपी तोसिफ पठाण याने विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगला होता.
पोलिसांनी हा सर्व अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. आरोपी तोसिफ रफिक पठाण याच्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २७४, १७५, २२३, १२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.