वाशी – तालुक्यातील मौजे लाखनगाव येथे एका घरातून तब्बल १ लाख ४० हजार २०० रुपये किमतीचा ७ किलो १० ग्रॅम वजनाचा ओला व सुका गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वाशी पोलिसांनी गुरुवारी (दि. २९ मे २०२५) पहाटे २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास केली. फुलचंद साहेबा शिंदे (रा. लाखनगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार आहे.
याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजयसिंह बाबासो भाळे (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फुलचंद शिंदे याने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता त्याच्या राहत्या घरात विनापरवाना विक्रीसाठी गुंगीकारक व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ (गांजा) साठवून ठेवला होता.
पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. यावेळी घरातून प्रतिकिलो २०,००० रुपये प्रमाणे एकूण १ लाख ४० हजार २०० रुपये किमतीचा ७ किलो १० ग्रॅम हिरव्या रंगाचा, उग्र वास असलेला ओला व सुका गांजा जप्त करण्यात आला.
आरोपी फुलचंद शिंदे याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) अन्वये गुन्हा नोंद क्रमांक १८८/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या कारवाईत पोलीस निरीक्षक थोरात आणि पोलीस उपनिरीक्षक भाळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करत आहेत. वेळेत गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादीस एफआयआरची प्रत देण्यात आली आहे.