वाशी -तालुक्यातील दसमेगाव पारधी पिढी येथे स्वतःच्या फायद्यासाठी घरात विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. शनिवारी सायंकाळी केलेल्या या कारवाईत २०,७२० रुपये किमतीचा १ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी, ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ७:२० च्या सुमारास दसमेगाव पारधी पिढी येथील भिमराव मोतीराम पवार (वय ५५) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. घराच्या परिसराची तपासणी केली असता, विक्रीसाठी ठेवलेला उग्र वासाचा ओला व सुका गांजा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून पिशवीसह एकूण १ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त केला, ज्याची किंमत अंदाजे २०,७२० रुपये आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शौकत पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी भिमराव पवार यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीवर गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८(क), २०(ब), आणि २०(ब)(II) अन्वये गुन्हा (गुरनं-१९०/२०२५) दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक थोरात आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.