तुळजापूर – तब्बल आठ कोटी रुपयांचा खर्च करून बांधलेल्या तुळजापूरच्या नव्या बसस्थानकाची पहिल्याच अवकाळी पावसाने अक्षरशः दाणादाण उडवली आहे. बांधकामाचा निकृष्ट दर्जा उघडा पडला असून, बसस्थानकात जागोजागी गळती लागल्याने सर्वत्र पाण्याची तळी साचली आहेत. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या महाविकास आघाडीने येत्या मंगळवारी, ३ जून रोजी, या भ्रष्टाचाराविरोधात ‘बोंबा मारो’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शहरातील जुने बसस्थानक पाडून मोठ्या थाटामाटात नवीन बसस्थानकाचे बांधकाम करण्यात आले. सुरुवातीला ७ कोटी १५ लाख रुपयांचा अपेक्षित खर्च पुढे तब्बल आठ कोटींवर पोहोचला. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चूनही प्रवाशांच्या नशिबी गैरसोयच आली आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावताच नवीन बसस्थानकाचे पितळ उघडे पडले. छतापासून ते भिंतींपर्यंत सर्वच बाजूंनी पाण्याची गळती सुरू झाल्याने बसस्थानकाला नदीचे स्वरूप आले आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी प्रवाशांना आडोसा शोधावा लागत असून, कर्मचाऱ्यांमध्येही तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
हा सरळसरळ जनतेच्या पैशाचा अपव्यय आणि शासकीय तिजोरीची लूट असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे. “निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून केलेले हे बांधकाम सुरुवातीपासूनच वादात होते. आता पावसाने ते सिद्ध झाले आहे. वाढीव खर्च दाखवून एसटी महामंडळ आणि शहराची फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत,” अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, युवक नेते ऋषिकेश जाधव, सुधीर कदम, दगड थोरात, आणि खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुशील बागराव यांनी केली आहे.
या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, मंगळवारी, ३ जून रोजी, बसस्थानकासमोर ‘बोंबा मारो’ आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, या निकृष्ट बांधकामाच्या चौकशीकडे आणि दोषींवर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.