धाराशिव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. परंडा तालुक्यात भरदिवसा घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असतानाच, तुळजापूर तालुक्यातून शेतकऱ्याची दोन बैलजोडी चोरीला गेली आहे. तर, येरमाळा येथे एका चालत्या वाहनातून विदेशी दारूची चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण २ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
परंड्यात भरदिवसा घरफोडी, १ लाखा ७४ हजारांचा ऐवज लंपास
परंडा तालुक्यातील शेळगाव येथील अशोक रघुनाथ भोसले (वय ३८) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. ही घटना ३१ मे २०२५ रोजी दुपारी १२.३० ते १.१० च्या सुमारास घडली. आरोपी अमोल बापू काळे (रा. पांढरेवाडी, ता. परंडा) व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १,७४,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अशोक भोसले यांनी १ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अंबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नळदुर्गमध्ये गोठ्यातून दोन बैल चोरीला
दुसऱ्या घटनेत, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शेतकरी धनराज विलास घोडगे (वय ४६) यांचे फुलवाडी शिवारातील गट नं. १२१ मधील गोठ्यात बांधलेले दोन बैल चोरीला गेले. २२ मे रोजी रात्री ९ ते २३ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. या बैलांची अंदाजे किंमत ७०,००० रुपये आहे. धनराज घोडगे यांनी १ जून रोजी दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
येरमाळ्यात चालत्या वाहनातून विदेशी दारूची चोरी
तिसरी घटना येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सांगवी मार्डी येथील विवेक कल्याण गायकवाड (वय २१) हे आपल्या एमएच १३ ए.एल. १४१९ या क्रमांकाच्या वाहनातून विदेशी दारूची वाहतूक करत होते. १ जून २०२५ रोजी सकाळी ७.१० ते ७.४५ च्या सुमारास तेरखेडा येथील उत्तम हॉटेलजवळ अज्ञात चोरट्यांनी चालत्या वाहनाची मागील ताडपत्री फाडून आतून विदेशी दारूच्या बाटल्या आणि बॉक्स असा एकूण २४,१०० रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी विवेक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलीस या तिन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.