धाराशिव: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी एका संतप्त शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडगाव सिद्धेश्वर येथील हे शेतकरी MIDC ने लावलेल्या उंच बोर्डावर चढून आंदोलन करत होते.
गेल्या पाच वर्षांपासून वडगाव सिद्धेश्वर येथील २७ शेतकरी कुटुंबे त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. २०१३ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या परिसरात एकूण १४६.९१ हेक्टर जमीन संपादित केली होती. त्यापैकी ५६.३४ हेक्टर जमिनीचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही, असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.
जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या या शेतकऱ्यांनी आज सकाळपासून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. आंदोलन अधिक तीव्र करत एका शेतकऱ्याने MIDC च्याच बोर्डावर चढून विषारी औषध प्राशन केले. विष प्राशन केल्यानंतरही ते घटनास्थळी घोषणाबाजी करत होते.
यावेळी घटनास्थळी पोलीस उपस्थित होते, मात्र प्रशासकीय अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले. पोलीस उपस्थित असतानाच शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याने वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला, तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने पोलिसांची मोठी अडचण झाली.
या घटनेमुळे जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून भूमिहीन आणि वंचित अवस्थेत जीवन जगत असलेल्या या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासन कधी लक्ष देणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.