तुळजापूर: तर भावड्यांनो, झालं असं की, आपल्या ‘मटणसम्राटा’ची फॉर्च्युनर बघून सोशल मीडियावरच्या ‘दुःखी आत्मां’नी रिल्सचा सुकाळ आणलाय. “काय उपयोग या शिक्षणाचा?”, “BS.c Agri करून काय फायदा, त्यापेक्षा बोकडं कापली असती तर बरं झालं असतं!” असे रील टाकून लोक आपल्या डिग्रीला आणि नोकरीला पार ‘व्हिलन’ बनवून मोकळे झालेत.
पण थांबा! पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! विषय शिक्षणाचा किंवा नोकरीचा नाहीच मुळी. विषय आहे तुमच्या आणि त्या ‘मटणसम्राटा’च्या माइंडसेटचा. चला, आज जरा ‘हॉटेल भाग्यश्री’च्या गल्ल्यावर बसून यशाचा हिशोबच मांडूया.
हिशोब नंबर १: ‘धंदा’ विरुद्ध ‘पगार’
तो पठ्ठ्या रस्त्याच्या कडेला हॉटेल टाको नाहीतर चंद्रावर! दिवसभरात जेवढं ‘ढवरा मटण’ विकलं जातंय, त्याचा नफा डायरेक्ट त्याच्या खिशात जातोय. याउलट, तुम्ही दिवसभर बॉसची कितीही ‘जी हुजुरी’ करा, कम्प्युटरवर कितीही कीबोर्ड बडवा, महिन्याच्या शेवटी हातात काय येतं? तर ठरलेला पगार! कंपनी करोडो कमावो, तुम्हाला वर्षातून एकदा ‘बोनस’ नावाचं लॉलीपॉप मिळतं, बस्स!
हिशोब नंबर २: ‘गर्दी’ची गॅरंटी, ‘कमाई’ची चलती
महाराष्ट्रात एकच नियम आहे: जिथं चव, तिथं खवय्यांची धाव! भाग्यश्री हॉटेलमध्ये ‘ढवरा मटणाचा’ घमघमाट सुटला की लोकांची रांग लागते. म्हणजे काय, तर डेली कॅश फ्लो ठरलेला! आज हजार, उद्या दोन हजार… हिशोब सुरूच. इथं नोकरदार माणूस स्पर्धेतच नाही. कारण तुमची कमाई महिन्याच्या आकड्यावर अडकलेली आहे आणि त्याची कमाई रोजच्या गर्दीवर ठरतेय.
हिशोब नंबर ३: ‘रिस्क है तो इश्क है!’
धंदा करायचा म्हणजे छातीवर दगड ठेवून पाण्यात उडी मारावी लागते. भांडवल गुंतवावं लागतं, ‘चार उचापतीखोर स्वभावाची माणसं सांभाळावी लागतात, आज धंदा चालेल की नाही याचं टेन्शन घ्यावं लागतं. याला म्हणतात ‘रिस्क’. आणि याच रिस्कचं फळ म्हणजे ‘फॉर्च्युनर’सारखं ‘रिवॉर्ड’! नोकरदार माणसाला ही आर्थिक रिस्क नको असते. आपल्याला वाटतं, “नको रे बाबा ती कटकट, आपली महिन्याच्या एक तारखेची इस्त्रीची नोट बरी!” मग फॉर्च्युनर कशी येणार?
फायनल राऊंड: डोक्यातला ‘किडा’ आणि मार्केटिंगचा ‘गिडा’
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा! हॉटेल भाग्यश्रीचा मालक शिक्षणाने कमी असेल, पण त्याच्या डोक्यात व्यवसायाचा ‘किडा’ वळवळतोय. तो एक नॅचरल मार्केटर आहे. त्यानं “आज हॉटेल बंद आहे” या वाक्याला सुद्धा असं काही विकलं की त्याचे रील पण व्हायरल झाले. याला म्हणतात ‘संधीचं सोनं करणं’.
याउलट, शिकलेला नोकरदार ‘सिक्युरिटी’ नावाच्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेला असतो. हीच सुरक्षिततेची भावना त्याची मोठी कमाई करण्याची क्षमता दाबून टाकते.
तर, शेवटचा शब्द:
म्हणून, उगाच आपल्या डिग्रीच्या नावाने रडत बसू नका. शिक्षण हे एक हत्यार आहे, त्याचा वापर कसा करायचा हे तुमच्या हिमतीवर आणि माइंडसेटवर अवलंबून आहे. असेल हिम्मत, तर घ्या धोका आणि उतरा मैदानात. नाहीतर ज्याने करून दाखवलंय, त्याचं मनमोकळं अभिनंदन करा आणि त्याच्याकडून शिका.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: “जेव्हा गमवायला काहीच नसतं, तेव्हाच कमवायला अख्खं जग असतं!”
व्हिडीओ बघा…