मुरूम – उमरगा तालुक्यातील मुरूमजवळील गणेश नगर येथे मंगळवारी, दि. ३ जून रोजी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमित बाळू राठोड (वय ११) आणि सुरज अर्जुन पवार (वय १२) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
अधिक माहितीनुसार, अमित आणि सुरज हे दोघे गणेश नगर तांड्याशेजारी असलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. बराच वेळ होऊनही मुले घरी न परतल्याने कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. शोधाअंती दोघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुलांचे मृतदेह मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. रुग्णालयात मुलांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. याप्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेने गणेश नगर आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.