धाराशिव: अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या अटक केली आहे. कृष्णा ऊर्फ पिंटु खडेल शिंदे, रा. मुरुड, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून साडेआठ तोळे (८४ ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ३,८७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले होते. या पथकात सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके, पो.ह. विनोद जानराव, प्रदीप वाघमारे, नितीन जाधवर, पोना. बबन जाधवर, चापोह/महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड, आणि विनायक दहीहंडे यांचा समावेश होता. पेट्रोलिंग करत असताना, पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कृष्णा शिंदे हा वाठवडा शिवारातील एका हॉटेलसमोर थांबलेला आहे.
या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. स्थानिक गुन्हे शाखेत आणून चौकशी केली असता, आरोपीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने धाराशिव शहर, ढोकी, वाशी, परंडा, लोहारा, आनंदनगर आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात अनेक घरफोड्या केल्याचे कबूल केले.
चोरीच्या मालाबाबत विचारणा केली असता, आरोपीने सांगितले की प्रत्येक गुन्ह्यानंतर मिळालेले सोन्याचे दागिने आणि पैसे ते आपसात वाटून घेत असत. त्याच्या वाट्याला आलेले दागिने त्याने मुरुड येथील घरी ठेवले होते. या दागिन्यांची विक्री करून त्याला मुरुडमध्ये प्लॉट घेऊन घर बांधायचे होते, असेही त्याने सांगितले.
या यशस्वी कामगिरीमध्ये अंगुलीमुद्रा शाखेचे सपोनि सुधीर कराळे आणि त्यांच्या पथकाचेही सहकार्य लाभले. पुढील कारवाईसाठी आरोपीला मुद्देमालासह आनंदनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.