स्थळ: धाराशिव. काळ: राजकारणाचा पारा चढलेला. पात्रं: भाजपचे दोन मंत्री, एक स्थानिक आमदार आणि एक खासदार. सूत्र: एक हुकलेली भेट आणि त्यावरून पेटलेलं राजकारण!
शनिवारी झालं असं की, भाजपचे वजनदार मंत्री नितेश राणे आणि सौ. पंकजा मुंडे, धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. आता एवढे मोठे नेते आले म्हणजे जिल्ह्याचे एकमेव भाजप आमदार राणा पाटील हजर असणारच, ही भाबडी अपेक्षा. पण छे! आमदारसाहेब गैरहजर. मग काय, विरोधकांना आयतंच कोलीत मिळालं. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लगेच बॅटिंग सुरू केली. राणा पाटलांच्या ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून त्यांनी असा काही चिमटा काढला की, “दोन हाणा पण मला मंत्री म्हणा,” अशी अवस्था झाल्याची टीका केली.
या टीकेनंतर धाराशिवच्या राजकीय वर्तुळात जणू भूकंपच झाला. आता आमदार साहेब गप्प बसतील तर ते कसले! ‘मैं भी हूँ डॉन’ हे दाखवून देणं गरजेचं होतं. पण कसं? तर थेट सरकारी दरबारातच पत्रकार परिषद घेऊन! मग काय, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास, जेव्हा अर्धा जिल्हा झोपेच्या अधीन झाला होता, तेव्हा माहिती कार्यालयाच्या ग्रुपवर एक गूढ संदेश अवतरला.
“विषय: मित्रचे उपाध्यक्ष मा. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषद. स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय. वेळ: सकाळी ११:३० वा.”
बस्स! एवढा संदेशच पत्रकारांची झोप उडवायला पुरेसा होता. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद? म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं घडणार! कुणी म्हणालं, आमदार साहेब विरोधकांचा समाचार घेणार. कुणी म्हणालं, मंत्रीपदाच्या दर्जावरून झालेल्या टीकेला सणसणीत उत्तर देणार. तर कुणाला वाटलं, थेट नितेश राणेंच्या वक्तव्यावरच बॉम्ब टाकणार! उत्साही पत्रकारांनी आपापली शस्त्रं (म्हणजे पेन, कॅमेरा आणि बूम माईक) परजून ठेवली.
सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांची मांदियाळी जमली. चहाच्या कपांपेक्षा चर्चांना जास्त उकळी फुटत होती. साडेअकरा वाजता राणा दादांचं आगमन झालं आणि सभागृहात एकदम शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. आता कुठला राजकीय स्फोट होणार, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
दादांनी बोलायला सुरुवात केली आणि… आणि सगळ्यांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं. विषय होता – कृष्ण खोऱ्याचं काम सुरू आहे!
अहो, पण हे तर सगळ्यांनाच माहीत होतं. परवाच तर प्रेस नोट आली होती. काही पत्रकारांना तर त्या कामावर फेरफटकाही मारून आणला होता. डोंगर पोखरून उंदीर निघावा, त्यातलाच हा प्रकार होता. निवडणुका आल्या की कृष्ण खोऱ्याचं पाणी आठवतं, पण ते नक्की येतं कधी, हे मात्र त्या पाण्यालाच ठाऊक!
पत्रकार परिषद संपताच, निराश झालेल्या पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. चला, उत्तरात तरी काहीतरी ‘मसाला’ मिळेल, ही वेडी आशा.
धाडसी पत्रकार: “दादा, ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा नाही, असा विरोधक आरोप करतायत…”
राणा पाटील (निर्विकारपणे): “त्यांच्या बाष्कळ बडबडीकडे मी लक्ष देत नाही.” (चेंडू सीमारेषेपार!)
दुसरा पत्रकार (आशेने): “भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने जिल्हा नियोजनाचा २६८ कोटींचा निधी रोखला, असं नितेश राणे म्हणाले. तुमचं मत काय?”
राणा पाटील (अलिप्तपणे): “ते नितेश राणेंनाच विचारा… मला माहिती नाही.” (दुसरा चेंडू थेट विकेटकीपरच्या हातात!)
थोडक्यात काय, तर ज्या प्रश्नांची उत्तरं ऐकायला अख्खा मीडिया जमला होता, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘माहिती असूनही माहिती नाहीत’ या कॅटेगरीत ढकलून देण्यात आली.
तात्पर्य: धाराशिवकरांना कृष्ण खोऱ्याचं पाणी मिळो न मिळो, पण राजकीय मनोरंजनाचा पूर मात्र अव्याहतपणे सुरू आहे. या पत्रकार परिषदेने एक गोष्ट मात्र सिद्ध केली – राजकारणात, मोठ्या आवाजाच्या घोषणेसाठी विषय अगदीच साधा असला तरी चालतो, फक्त स्थळ आणि वेळ ‘गूढ’ असावी लागते! पत्रकार बिचारे निराश होऊन परतले, या आशेवर की पुढच्या वेळी तरी पोखरलेल्या डोंगरातून किमान एखादा ससा तरी बाहेर येईल!