धाराशिव – घरात आणि रुग्णालयात लिफ्ट बसवून देण्याच्या नावाखाली पुण्यातील एका कंपनीच्या मालकाने धाराशिव येथील एका नामांकित डॉक्टरची तब्बल १२ लाख ३७ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. पैसे घेऊनही लिफ्ट न बसवल्याने अखेर डॉक्टरांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात पुण्यातील कंपनी मालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी डॉक्टर कैलास चंद्रकांत गिलबिले (वय ४८, रा. स्पंदन हॉस्पीटल, धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. गिलबिले यांना त्यांच्या घरासाठी आणि रुग्णालयासाठी लिफ्ट बसवायची होती. यासाठी त्यांची ओळख पुण्यातील खराडी येथील ‘फोर एस एलिव्हेटर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे मालक आनंद प्रल्हाद कोटंबे याच्याशी झाली.
कोटंबे याने लिफ्ट बसवून देण्याचे आश्वासन देऊन डॉ. गिलबिले यांच्याकडून २९ जून २०२२ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत धनादेशाद्वारे (चेकद्वारे) वेळोवेळी एकूण १२ लाख ३७ हजार ५०० रुपये घेतले. मात्र, ठरलेली रक्कम घेऊनही आरोपी कोटंबे याने लिफ्ट बसवून दिली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही तो टाळाटाळ करत होता.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. गिलबिले यांनी २० जून २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी आनंद प्रल्हाद कोटंबे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.







