तुळजापूर : शहरातील गजबजलेल्या सावरकर चौकात लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने विनापरवाना चाकू बाळगणाऱ्या एका तरुणावर तुळजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २२ जून २०२५ रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली.
सहदेव महादेव कानडे (वय ३१, रा. तीर्थ खुर्द, ता. तुळजापूर) असे आरोपीचे नाव आहे. तुळजापूर पोलिसांचे पथक सावरकर चौक परिसरात गस्त घालत असताना, आरोपी सहदेव कानडे हा संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ अंदाजे ५०० रुपये किमतीचा एक स्टीलचा चाकू बेकायदेशीररित्या बाळगलेला आढळला.
याप्रकरणी, पोलीस नाईक वैभव नामदेव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी सहदेव कानडे याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी चाकू जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.