धाराशिव: शहराच्या सोलापूर रोडवरील खाजा नगर परिसरात बुधवारी सकाळी एका भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत नगरपरिषदेच्या एका कंत्राटी महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मयत महिलेचे नाव मंगल मेसा गवळी (वय ६०) असून त्या बेंबळी येथील रहिवासी होत्या. त्या धाराशिव नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास, नेहमीप्रमाणे आपले काम करत असताना एका भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, गवळी यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच धाराशिव शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेली कार जप्त केली असून, आरोपी कार चालक इकबाल हनीफ तांबोळी (वय ३६) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.