नळदुर्ग : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १८ वर्षीय दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी दिव्यांग असल्याची माहिती असूनही, गावातीलच एका तरुणाने घरात घुसून लग्नाचे आमिष दाखवत हे अमानुष कृत्य केले. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही उजव्या हाताने आणि उजव्या पायाने दिव्यांग आहे. दिनांक २३ जून २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास ती घरात एकटी होती. हीच संधी साधून गावातील आरोपी तरुण तिच्या घरात घुसला.
“मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, आपण लग्न करू,” असे आमिष दाखवून त्याने पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने अखेर २५ जून रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.