बेंबळी: गावाजवळील जंगलातून जाणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेला ‘तुला आणि तुझ्या मुलांना सांभाळतो’ असे आमिष दाखवून, तिला जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गावातीलच एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय महिला २३ जून २०२५ रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास गावाजवळच्या जंगलालगतच्या रस्त्यावरून जात होत्या. यावेळी गावातीलच एका तरुणाने त्यांना अडवले. “तुझा नवरा गेला तर जाऊ दे, मी तुला आणि तुझ्या मुलांना सांभाळतो,” असे तो म्हणाला.
यानंतर आरोपीने पीडितेवर जबरदस्ती करत तिला रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलातील शेवग्याच्या झाडाजवळील एका खड्यात ओढत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या भयंकर प्रकारानंतर पीडित महिलेने २६ जून रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी तरुणाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम-६४ अन्वये अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कायद्यानुसार पीडितेची आणि गावाच्या नावाची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.