धाराशिव – बोअरवेलच्या पाण्याच्या वादातून एका ४८ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लोखंडी सळई आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील भिकार सारोळा येथे घडली आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तु अंबादास भक्ते (वय ४८, रा. भिकार सारोळा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ही घटना २९ जून २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास भिकार सारोळा शिवारातील शेत गट क्रमांक ८३७ मध्ये घडली. आरोपी रोहन शंकर भक्ते, शंकर उर्फ आप्पासाहेब भक्ते आणि सविता शंकर भक्ते (सर्व रा. भिकार सारोळा) यांनी संगनमत करून दत्तु भक्ते यांना बोअरवेलच्या पाण्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी दत्तु यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळईने आणि काठीने मारहाण करून जखमी केले. इतकेच नाही, तर आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलच्या मडगार्डची तोडफोड करून नुकसान केले आणि ‘तुला जिवे ठार मारू’ अशी धमकीही दिली.
या घटनेनंतर दत्तु भक्ते यांनी ३० जून रोजी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३२४(४), ३२४(५) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.