नळदुर्ग: प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमंगल मल्टीस्टेट बँकेचा शाखाधिकारी कैलास घाटे याने रचलेल्या २५ लाखांच्या दरोड्याच्या बनावामागे शेअर बाजारातील नुकसान आणि सावकारांच्या त्रासासोबतच मटक्याचे व्यसनही एक प्रमुख कारण असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी घाटे याला अटक केली असून, त्याच्या मोबाईलमध्ये मटक्याच्या चिठ्यांचे स्क्रीनशॉटही सापडले आहेत.
काय आहे प्रकरण?
३० जून रोजी, शाखाधिकारी कैलास घाटे याने २५ लाखांची रोकड लुटल्याचा बनाव रचला होता. त्याने स्वतःच्या अंगावर ब्लेडने वार करून हा दरोडा खरा भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचा खोटेपणा उघड झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी लुटल्याचा बनाव केलेली संपूर्ण २५ लाखांची रक्कम त्याच्या घरातून जप्त केली आहे.
व्यसनाधीनतेतून रचला कट
पूर्वीच्या तपासात, शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडून आणि खासगी सावकारांच्या कर्जाच्या ओझ्यामुळे घाटेने हे कृत्य केल्याचे समोर आले होते. आता, त्याला मटक्याचेही व्यसन असल्याचे उघड झाले आहे. या दुहेरी आर्थिक संकटामुळे त्याने बँकेच्या पैशांवर डल्ला मारण्याचा कट रचला.
दरम्यान, ‘धाराशिव लाइव्ह’ने ही सर्व माहिती अगोदरच प्रसिद्ध करून, पुन्हा एकदा आघाडी मिळवली आहे.या संपूर्ण प्रकरणावर आज पोलीस अधीक्षक रितू खोखर पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती देणार आहेत.