ढोकी : शेतीच्या बांधावर मुरुम टाकण्याच्या किरकोळ कारणावरून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याला पाच जणांनी मिळून लोखंडी रॉड, कोयता, वीट आणि काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील रुई ढोकी येथे घडली आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब खंडू जाधव (वय ५५, रा. रुई ढोकी) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी १ जुलै २०२५ रोजी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ जून रोजी सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास घडली. बाळासाहेब जाधव यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर मुरुम टाकला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली.
आरोपी सुशीलकुमार बाबुराव पाटील, अजिंक्य सुशीलकुमार पाटील, भैरवनाथ सुशीलकुमार पाटील, विनोद नवनाथ पाटील आणि आश्रुबा व्यंकटराव पाटील (सर्व रा. रुई ढोकी) यांनी बाळासाहेब जाधव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाद विकोपाला जाऊन आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड, कोयता, वीट आणि काठीने जबर मारहाण केली. यात जाधव गंभीर जखमी झाले. तसेच, आरोपींनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
बाळासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.