धाराशिव: ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी झालेल्या कर्जामुळे एका बँक व्यवस्थापकाने स्वतःच बँकेचे २५ लाख रुपये चोरून फिल्मी स्टाईलने लुटीचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. केवळ २४ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी आरोपी बँक व्यवस्थापकाला अटक केली असून, चोरलेली संपूर्ण रक्कम जप्त केली आहे. कैलास मारुती घाटे (वय ३५, रा. नळदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय आहे घटना?
सोमवार, दिनांक ३० जून २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सोलापूर-धाराशिव महामार्गावर ईटकळ टोल नाक्याजवळ एका बँकेच्या गाडीला लुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नळदुर्ग शाखेचे व्यवस्थापक कैलास घाटे हे बँकेची २५ लाख रुपयांची रोकड सोलापूरला घेऊन जात होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण करून, डोळ्यात चटणी फेकली आणि पैशांची बॅग घेऊन पळ काढला, अशी माहिती घाटे यांनी पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी घाटे यांना नळदुर्ग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांना आला संशय
पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी जेव्हा जखमी कैलास घाटे यांची चौकशी सुरू केली, तेव्हा त्यांच्या बोलण्यात आणि देहबोलीत विसंगती आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
कर्ज आणि ऑनलाइन गेमचे व्यसन
पोलिसांनी गोपनीय मार्गाने घाटे यांच्याबद्दल अधिक माहिती काढली असता, ते मोठ्या आर्थिक कर्जात बुडालेले असल्याचे समोर आले. तसेच, त्यांना ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद होता आणि त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घाटे यांची पुन्हा सखोल चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या घाटे यांनी अखेर पोलिसांपुढे आपला गुन्हा कबूल केला.
आरोपीनेच रचला बनाव
आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी घाटे यांनी स्वतःच या लुटीचा बनाव रचला होता. त्यांनीच बँकेचे २५ लाख रुपये काढून लपवून ठेवले होते आणि त्यानंतर लुटल्याचा बनाव केला होता. आरोपीने गुन्हा कबूल केल्यानंतर त्याच्याकडून लपवून ठेवलेली २५ लाख रुपयांची संपूर्ण रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस निरीक्षक सचिन यादव आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.