परंडा : जुन्या भांडणाचा राग मनात धरून ५२ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि बेल्टने मारहाण केल्याची घटना परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथे घडली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादा बाबु आवाळे (वय ५२, रा. कुंभेफळ, ता. परंडा) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रदिप प्रकाश आवाळे, संतोष श्रीधर आवाळे आणि बाळु श्रीधर आवाळे (सर्व रा. कुंभेफळ, ता. परंडा, मूळ रा. कुंभेफळ गोयेगाव, ता. करमाळा) या तिघांनी मिळून ही मारहाण केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ जून २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास कुंभेफळ गावात घडली. फिर्यादी दादा आवाळे आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद होता. याच वादातून आरोपींनी दादा आवाळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी व कमरेच्या बेल्टने मारहाण करून जखमी केले.
घडलेल्या प्रकारानंतर दादा आवाळे यांनी ३ जुलै २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.