लोहारा : तालुक्यातील तोरंबा येथे एका महिलेचे घर आणि दुकान फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साडी, तांदळाची पोती आणि तेलाचे बॉक्स असा सुमारे ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या चोरीप्रकरणी गावातीलच तीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ ते १५ जून दरम्यान घडली असून, गुरुवारी (दि. ३ जुलै) याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
इंदुमती देविदास भालेराव (वय ४८, रा. तोरंबा, ता. लोहारा) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. जयवंत जनार्धन चव्हाण, अविनाश राजेंद्र कदम आणि सोयम लक्ष्मण कांबळे (सर्व रा. तोरंबा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंदुमती भालेराव यांचे तोरंबा येथील घर व दुकान १२ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते १५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद होते. हीच संधी साधून आरोपींनी घराचे आणि दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील ३ ग्रॅमची सोन्याची साखळी, १७ तोळे वजनाचे चांदीचे पायातील चैन, ६ हजार रुपये किमतीची शालू साडी, तांदळाची दोन पोती आणि कीर्ती गोल्ड तेलाचे दोन बॉक्स असा एकूण ३५,८०० रुपयांचा माल चोरून नेला.
प्रवासावरून परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यावर इंदुमती भालेराव यांनी ३ जुलै रोजी लोहारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत गावातीलच तीन तरुणांवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
याप्रकरणी लोहारा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(ए), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.