मुंबई: धाराशिव जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे जमिनीच्या मोबदल्यावरून झालेल्या वादातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पवनचक्की कंपनीकडून योग्य मोबदला मिळावा यासाठी लढा देणाऱ्या एका शेतकऱ्याला चक्क उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) स्वप्नील राठोड यांनी त्याच्याच शेतातील ऊसाने अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाला शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात वाचा फोडली. त्यांनी शेतकऱ्याची संपूर्ण व्यथा सभागृहासमोर मांडत सरकारला धारेवर धरले. “रक्षकच जर भक्षक होत असतील, तर सामान्य शेतकऱ्याने न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल विचारत आमदार पाटील यांनी दोषी अधिकारी आणि कंपनीच्या गुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
आमदार पाटील यांच्या प्रश्नावर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सुरुवातीला थातुरमातुर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर माजी मंत्री आमदार अमित देशमुख (लातूर) आणि आमदार नाना पटोले यांनीही आक्रमक पवित्रा घेत प्रश्नांचा भडीमार केला. विरोधी पक्षांचा वाढता दबाव पाहता, अखेर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री भोयर यांनी सभागृहाला दिले.
या प्रकरणामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता सरकारच्या चौकशीकडे आणि होणाऱ्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Video