मुरुम : कुटुंबातील सदस्यांना होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना लोहारा तालुक्यातील आष्टाकासार तांडा येथे घडली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून सात जणांविरोधात मुरुम पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमणाबाई दासु चव्हाण (वय ७५, रा. आष्टाकासार तांडा, ता. लोहारा) असे आत्महत्या केलेल्या वृद्धेचे नाव आहे. त्यांनी दिनांक ३० जून २०२५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन केले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी त्यांचे सुपुत्र सोमनाथ दासु राठोड (वय ३५, सध्या रा. वाघोली, पुणे) यांनी ४ जुलै २०२५ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, गावातीलच आरोपी भोजु विठोबा चव्हाण, ताराचंद विठोबा चव्हाण, लुकेश बाबुराव चव्हाण, शांताबाई ताराचंद चव्हाण, संगीता लुकेश चव्हाण, सचिन ताराचंद चव्हाण आणि सुमन बाबुराव चव्हाण यांनी संगनमत करून फिर्यादी सोमनाथ, त्यांची पत्नी, भाऊ धोंडीराम, वहिणी शालुबाई आणि पुतण्या श्रीरुप यांना वेळोवेळी शिवीगाळ करत काठी, रॉडने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.
आरोपींकडून होणाऱ्या याच सततच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून आपल्या आईने, रमणाबाई यांनी, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असे सोमनाथ राठोड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीच्या आधारे मुरुम पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ११८(२), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.