उमरगा: तालुक्यातील नाईकचाकुर येथील एका किराणा दुकानावर छापा टाकून उमरगा पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुमारे ७,८०० रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दुकान चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईकचाकुर येथील ‘आनंदी किराणा स्टोअर्स’मध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुकानावर छापा टाकला. यावेळी दुकान चालक शरद अंकुश पवार (वय ३८, रा. नाईकचाकुर) हा प्रतिबंधित पदार्थांची विक्री करताना आढळून आला.
पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता, त्यात ‘डायरेक्टर पान मसाला’च्या ५२ पुड्या आणि तंबाखूच्या ५२ पुड्या असा एकूण ७,८०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी हा सर्व साठा जप्त केला आहे.
याप्रकरणी दुकान चालक शरद पवार याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.