धाराशिव – जिल्ह्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र असलेल्या कुंथलगिरी (ता. भूम) येथे दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील दोन वृद्ध महिलांचे सोन्याचे दागिने तीन अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सुमारे १ लाख ९२ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले असून, या घटनेमुळे तीर्थक्षेत्राच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याप्रकरणी संगीता सुदर्शन शहा (वय ६४, रा. कुर्ला, मुंबई) यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता शहा आणि त्यांच्यासोबत मंगलाबाई पन्नालाल लुंगारे या दोघी जणी ५ जुलै रोजी कुंथलगिरी येथे दर्शनासाठी आल्या होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास त्या मुख्य मंदिराच्या कंपाऊंड वॉलजवळ असताना, तीन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले. काही कळण्याच्या आतच चोरट्यांनी दोघींच्या गळ्यातील आणि अंगावरील ६४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावले आणि तिथून पळ काढला.
या घटनेमुळे दोन्ही महिला प्रचंड घाबरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ७ जुलै रोजी वाशी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एकूण १ लाख ९२ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे.
या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. ऐन गर्दीच्या ठिकाणी आणि तीर्थक्षेत्रात झालेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.