वाशी – वाशी पोलिसांनी इंदापूर शिवारात मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणारा एक पिकअप ट्रक पकडला आहे. या कारवाईत पाच गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून, वाहनासह एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाशी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. ०८ जुलै २०२५ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास इंदापूर शिवारातील भैरवनाथ साखर कारखान्यासमोरील महामार्गावर एक पिकअप (क्र. एमएच १३ डीक्यू ०७०६) संशयास्पदरीत्या जात होता. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात अत्यंत निर्दयपणे जनावरे कोंबल्याचे आढळून आले.
या वाहनात ३ जर्सी गायी, १ खिल्लार गाय आणि १ गीर गाय अशा एकूण ५ गोवंशीय जनावरांची त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, कत्तलीसाठी अवैध वाहतूक केली जात होती.
पोलिसांनी तात्काळ वाहनचालक किरण तायाप्पा शिंदे (वय ३८, रा. परंडा, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम आणि प्राणी परिवहन नियमांतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या जनावरांची रवानगी जवळच्या गोशाळेत करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.