धाराशिव: विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून केबल वायर चोरून त्यातील तांब्याची तार विकणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत एका विधीसंघर्ष बालकासह एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून मोटरसायकलसह एकूण ७१,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांचे पथक जिल्ह्यातील गुन्हेगारांचा शोध घेत होते. बेंबळी पॉईंट येथे पेट्रोलिंग करत असताना, दोन इसम चोरीची केबल जाळून त्यातील तांब्याची तार विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला आणि दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे विशाल शाम जाधव (वय २० वर्षे) आणि एक विधीसंघर्ष बालक (दोघेही रा. साठेनगर, धाराशिव) असल्याचे सांगितले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी तुळजापूर, नळदुर्ग आणि तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून केबल वायर चोरल्याची कबुली दिली.
पथकाने पंचांसमक्ष आरोपींकडून चोरीची केबल वायर आणि एक मोटरसायकल असा एकूण ७१,६६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना आणि जप्त केलेल्या मुद्देमालाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, पोलीस नाईक अशोक ढगारे, पोलीस अंमलदार योगेश कोळी आणि चालक पोलीस हवालदार विजय घुगे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालमत्ता विषयक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.