धाराशिव: गाडीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यास गेलेल्या माय-लेकास काठी आणि दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील सारोळा येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात एका महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शारदा चंद्रकांत उकिरडे (वय ४५, रा. सारोळा) आणि त्यांचा मुलगा अजय उकिरडे हे दि. १० जुलै २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गावातीलच आरोपी बाळासाहेब बाबू देडे, वर्धन बाळासाहेब देडे, मनिषा बाळासाहेब देडे व लक्ष्मण देडे यांच्याकडे त्यांच्या गाडीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी गेले होते.
याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढत जाऊन आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीत शारदा उकिरडे आणि त्यांचा मुलगा अजय हे गंभीर जखमी झाले. तसेच, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर शारदा उकिरडे यांनी दि. १३ जुलै २०२५ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाळासाहेब देडे, वर्धन देडे, मनिषा देडे आणि लक्ष्मण देडे या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७(२),(३), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






