भूम : कत्तलीच्या उद्देशाने दोन टेम्पोमधून गोवंशीय जनावरांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर भूम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन टेम्पोसह जनावरे असा एकूण १४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पुणे आणि धाराशिव जिल्ह्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. १३ जुलै २०२५ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास भूम-पार्डी रस्त्यावरील श्रावणी हॉटेलसमोर दोन आयशर टेम्पोमधून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती फिर्यादी विराज आनंद सोले यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच भूम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दोन आयशर टेम्पो (MH 12 / QC 8955 व MH 12 / HD 4220) थांबवून तपासणी केली असता, त्यात गोवंशीय जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे आढळून आले. ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे चौकशीत समोर आले.
याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल करून आरोपी अलीम रसुल (वय ३५, रा. लिंबेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), सैफ सलाउद्दीन कुरेशी (वय १९, रा. जावाईवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) आणि रामदास शिवाजी दराडे (वय ४०, रा. रामेश्वर, ता. भूम) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता (BNS) यांच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, भूम पोलीस पुढील तपास करत आहेत.
कळंब: गोरक्षकाच्या सतर्कतेमुळे कत्तलीसाठी होणारी गायींची वाहतूक उघड; चालकावर गुन्हा दाखल
कळंब : कत्तलीच्या उद्देशाने टेम्पोमधून गायींची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचा प्रकार एका सतर्क गोरक्षकामुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळंब पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करून जनावरांची सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १३ जुलै २०२५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास कळंब-मोहा रस्त्यावरील गुंजाळ वस्तीजवळ गोरक्षक निखिल अण्णासाहेब मडके यांना एक आयशर टेम्पो (क्र. एमएच ०८ डब्ल्यू ४३९७) संशयास्पदरीत्या जाताना दिसला. त्यांनी टेम्पो थांबवून तपासणी केली असता, त्यात चार जर्शी गायी अत्यंत निर्दयीपणे, चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता कोंबलेल्या आढळून आल्या.
या गायींची किंमत अंदाजे ३३,००० रुपये असून, त्यांना कत्तलीसाठीच नेले जात असल्याचा संशय आल्याने श्री. मडके यांनी तात्काळ कळंब पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि फिर्यादीच्या तक्रारीवरून सरकारतर्फे टेम्पो चालकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ५, ५(ब), ९ आणि ११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जनावरे आणि वाहन जप्त केले असून, पुढील तपास सुरू आहे. एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे चार मुक्या जनावरांचे प्राण वाचले आहेत.