तुळजापूर: शहरातील पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका मोबाईल दुकानात चोरीची मोठी घटना घडली आहे. चोरट्यांनी दुकानाच्या छतावरून प्रवेश करून तब्बल १३ लाख ५३ हजार रुपये किमतीचे २३ महागडे मोबाईल लंपास केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, दोन वर्षांत दुसऱ्यांदा दुकान फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील नवीन बसस्थानकाजवळ धाराशिव रोडवर असलेल्या एस. एस. मोबाईल दुकानात सोमवारी (दि. १४) रात्री १२:३० ते १ च्या सुमारास ही चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागे असलेले लस्सीचे दुकान फोडून, तेथून छतावाटे मोबाईल दुकानात प्रवेश केला. चोरी करताना चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते, आणि ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दुकान मालक सचिन शिंदे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.
चोरटे माहितगार असल्याचा संशय
चोरट्यांनी दुकानातील शेकडो मोबाईलपैकी केवळ महागडे मोबाईल चोरले आहेत. यामध्ये सॅमसंग गॅलक्सी एस २४ चे ४ नग, विवो व्ही ४० चा १ नग, विवो व्ही ५०० चे ४ नग, आणि ॲपलचे १४ आयफोन यांचा समावेश आहे. एकूण १३ लाख ३३ हजार ५९१ रुपयांचे २३ मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत. ज्या पद्धतीने फक्त महागडे मोबाईल निवडले गेले, त्यावरून चोरटे माहितगार असावेत असा संशय व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपूर्वीही झाली होती मोठी चोरी
विशेष म्हणजे, याच दुकानात दोन वर्षांपूर्वी २० मार्च २०२३ रोजी चोरी झाली होती. त्यावेळी चोरट्यांनी २८ लाख रुपये किमतीचे १२० मोबाईल लंपास केले होते. पोलीस ठाण्याजवळ वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.