उमरगा : लातूर-उमरगा रस्त्यावरील एका हॉटेलसमोर जेवणासाठी गेलेल्या व्यक्तीच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने ५२ हजार रुपयांची रोकड आणि बँक चेकबुक चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १५ जुलै) दुपारी घडली असून, यामुळे परिसरातील वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
याप्रकरणी प्रदीप सुभाष आष्टे (वय ३९, रा. कराळी, ता. उमरगा) यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते १५ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्यांची स्विफ्ट कार (क्र. एमएच २५ बीए ९४४६) लातूर-उमरगा रस्त्यावरील एमबी रिसॉर्ट हॉटेलच्या गेटवर उभी करून जेवणासाठी आत गेले होते.
ते साधारण अर्ध्या तासाने परत आले असता, त्यांना गाडीची काच फुटलेली दिसली. अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून गाडीचे नुकसान केले आणि ड्रायव्हरच्या बाजूच्या कप्प्यात ठेवलेली ५२ हजार रुपयांची रोकड व स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेकबुक चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
प्रदीप आष्टे यांनी दुसऱ्या दिवशी (दि. १६ जुलै) दिलेल्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
तुळजापूर तालुक्यात घरासमोरून मोटारसायकल चोरीला; पोलिसात गुन्हा दाखल
तुळजापूर: तालुक्यातील नांदुरी येथे घरासमोर लावलेली ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खंडेराव बिरू मुळेकर (वय ३६, रा. नांदुरी, ता. तुळजापूर) यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल (क्र. एमएच २५ एए ८८०३) ११ जुलै रोजी रात्री ९ वाजता आपल्या घरासमोर उभी केली होती.
दुसऱ्या दिवशी (१२ जुलै) सकाळी ५ वाजता त्यांना मोटारसायकल जागेवर दिसली नाही. परिसरात शोधाशोध करूनही ती न सापडल्याने, रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी खंडेराव मुळेकर यांनी १६ जुलै रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.