धाराशिव: जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. जवळपास महिनाभराच्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे जिल्ह्यातील सुमारे ५ लाख हेक्टरवरील खरिपाची कोवळी पिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी पिके माना टाकत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, त्याच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
यंदा मे महिन्यात जिल्ह्यात तब्बल २९८ मिमी विक्रमी पाऊस झाला होता. या दमदार पूर्वमोसमी पावसाच्या जोरावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने ५.११ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली होती. यामध्ये सर्वाधिक ४.१६ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा आहे. मात्र, पेरणीनंतर म्हणजेच गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात केवळ १३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या महिनाभरापासून केवळ कोरडे आभाळ आणि सोसाट्याचे वारे वाहत आहेत. त्यातच भर म्हणून गेल्या चार दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने जमिनीतील ओलावा नाहीसा झाला आहे. यामुळे उगवलेली कोवळी पिके कोमेजू लागली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, ते तुषार, ठिबक आणि अन्य साधनांनी पाणी देऊन पिके जगवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, बहुतांश जिरायती शेती पावसावरच अवलंबून असल्याने पिकांची अवस्था दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे. जर पुढील काही दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.