धाराशिव – शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात घरासमोर लावलेली एक मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विशाल सुरेश रणखांब (वय ४६, रा. रेल्वेस्टेशन रोड, शिक्षक कॉलनी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांनी आपली २०,००० रुपये किमतीची निळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक: एमएच २५ ए ३५३४) दिनांक ४ जुलै रोजी रात्री आपल्या घरासमोर उभी केली होती.
मध्यरात्री १ ते सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेली. बराच शोध घेऊनही गाडी न सापडल्याने अखेर विशाल रणखांब यांनी गुरुवारी (दि. १७ जुलै) आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.