नवी मुंबई: शासनाकडून गरीब रुग्णांच्या उपचारासाठी आलेला तब्बल ३२ लाख रुपयांचा निधी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीच हडपल्याची धक्कादायक घटना नेरूळमध्ये उघडकीस आली आहे. नेरूळ येथील तेरणा रुग्णालय आणि रिसर्च सेंटरमध्ये (Terna Hospital and Research Centre) हा प्रकार घडला असून, रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांनी मिळून हा अपहार केला आहे या प्रकरणी, रुग्णालयाने दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा झाला घोटाळा उघड
शासनाकडून गोरगरीब रुग्णांसाठी वैद्यकीय मदतीच्या उद्देशाने विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी एका योजनेअंतर्गत, जर उपचाराचा खर्च दहा हजार रुपयांच्या आत असेल, तर रुग्णाने भरलेली बिलाची रक्कम शासन रुग्णालयाला परत करते. रुग्णालयाने ही रक्कम संबंधित रुग्णांना परत करणे अपेक्षित असते.
मात्र, तेरणा रुग्णालयातील रोहन ठाकूर (३५), प्रणय पाटील (३५) व बाळासाहेब सैंदाणे (३४) या तीन कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला. अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना या योजनेच्या लाभाची माहिती नसते, याचा फायदा घेत त्यांनी मागील काही महिन्यांत हा घोटाळा केला. शासनाकडून निधी परत आल्यानंतर, तो रुग्णांना परत न करता त्यांनी स्वतःच्या किंवा इतरांच्या खात्यात जमा करून घेतला.
या घोटाळ्यामुळे सुमारे ३५० गरीब रुग्णांचे एकूण ३२ लाख २१ हजार रुपये हडप करण्यात आले, रुग्णालयाने केलेल्या अंतर्गत पडताळणीत हा गैरप्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे इतर रुग्णालयांमध्येही अशा प्रकारे शासनाच्या निधीचा गैरवापर झाला आहे का, याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.