तुळजापूर – शेतीपंपासाठी आवश्यक डिमांडची रक्कम भरूनही तीन वर्षे वीज जोडणी न देता केवळ कागदोपत्री जोडणी दाखवून वीजबिल सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार तुळजापूर तालुक्यात समोर आला आहे. या प्रकारामुळे शेतकरी शासकीय लाभांपासून वंचित राहिला असून, तक्रारीनंतर महावितरणने चूक मान्य करत लवकरच काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
मोरडा येथील शेतकरी भारत भिमराव पाटील यांनी दिनांक ०९ ऑगस्ट २०२१ रोजी शेतीपंपाच्या वीज जोडणीसाठी ११,२८५ रुपयांची रक्कम महावितरणकडे जमा केली होती. त्यांच्या विहिरीपासून वीजवाहिनीचे अंतर सुमारे १००० फूट असल्याने, लघुदाब किंवा उच्चदाब वाहिनीद्वारे अधिकृत जोडणी मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्ष वीजजोडणी न करताच त्यांना केवळ कागदोपत्री जोडणी दिल्याचे दाखवून वीजबिल सुरू करण्यात आले.
या अजब कारभारामुळे पाटील यांना ‘पेड पेंडिंग’ योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले. इतकेच नव्हे, तर नवीन ‘मुख्यमंत्री सौर योजनेचा’ लाभ मिळण्यापासूनही ते मुकले. अखेर, पाटील यांनी २९ जानेवारी २०२४ रोजी महावितरणच्या तुळजापूर उपविभागीय कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करून, कोणतीही प्रत्यक्ष जोडणी न देता कागदोपत्री व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.
या तक्रारीची दखल ‘समाधान पोर्टल’ द्वारे घेण्यात आल्यानंतर, महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाने २९ मे २०२४ रोजी उत्तर दिले. श्री. भारत पाटील यांची तक्रार प्राप्त झाली असून, त्यांच्या शेतीपंपाच्या वीज पुरवठ्याचे काम मे. नयन इलेक्ट्रिकल्स, कझाड (ता. इंदापूर) या कंत्राटदाराला सोपवण्यात आले आहे, असे महावितरणने कळवले आहे.
महावितरणने आश्वासन दिले आहे की, हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल आणि जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंतचे वीजबिल कमी करून देण्यात येईल. संबंधित उपविभागीय कार्यालयाला कंत्राटदाराकडून काम करून घेण्याचे आणि तोपर्यंत ग्राहकाचे वीजबिल दुरुस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, आता दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.