भूम – येथील पारडी रोड परिसरात पाण्याच्या किरकोळ भांडणातून एका २४ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, भूम पोलीस ठाण्यात अक्षय विनोद गायकवाडसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी स्वरुप श्रीराम चौरे (वय २४, रा. कुसुमनगर, भुम) यांच्या आईचे आणि आरोपींचे नळाच्या पाण्यावरून पूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपी अक्षय विनोद गायकवाड आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी २२ जुलै रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास स्वरूप यांना आर्यन धारीवाल टाउनशिपसमोरील सिमेंट रोडवर गाठले.
आरोपींनी स्वरूप यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला चढवला आणि गंभीर जखमी केले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या रोहन कुटे यालाही ‘तुला पण मारून टाकीन’ अशी धमकी देण्यात आली.
याप्रकरणी स्वरूप चौरे यांनी २३ जुलै रोजी भूम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय गायकवाड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ३५२, ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.